शुक्रवार, २९ डिसेंबर, २०१७

'शोध': एक अद्भुत अनुभव

       खरंतर खूपच महिन्यांनी अवघड काहीतरी लिहिते आहे॰ इतिहासाचा काहीही अभ्यास नसताना 'शोध' बद्दल काहीही लिहिणं ही घोडचूक असेल हे माहीत असूनही माझ्या तुटपुंज्या बुद्धीला जे समजलं थोडस, ते मांडतेय॰
      स्वराज्याच्या स्वायत्ततेसाठी १६८०मध्ये सुरतेच्या दुसऱ्या लुटीच्यावेळी सात हजार जनावरांवर लादलेला खजिना स्वराज्यात पोहोचला नाही. नियोजित मार्गात मोगल सैनिक आडवे आले आणि गोंदाजी नारो मोगलांच्या हाती सापडले परंतु त्यांनी मोगलांना खजिन्याचा पत्ता लागू दिला नाही॰ शिवाजी महाराजांपर्यंत लूट पोचवण्यासाठी गोंदाजी नारो यांनी कोठडीतील इंग्रज कैद्याच्या साथीने नामी शक्कल लढवली परंतु तो खजिना काही महाराजांपर्यंत पोचला नाही॰ तो खजिना नेमका कुठे दडवला होता आणि त्या खजिन्याचे, गोंदाजीने कैद्याच्या साथीने लढविलेल्या युक्तिचे पुढे काय झाले ह्याचा 'शोध' वर्तमानकाळाचा संदर्भ देत कथानकामध्ये रोमहर्षकपणे मांडला आहे.
      एकूण ४९७ पानांपैकी अगदी ४७० व्या पानापर्यंत ही कादंबरी उत्कंठा बांधून ठेवते सुरतेच्या लुटीचा क्लारा रिचर्ड ते गौळापर्यंतचा मार्ग अतिशय रोमहर्षक वाटतो अपवाद कादंबरीमध्ये सविस्तरपणे नमूद केलेल्या अद्ययावत तांत्रिक बाबींचा परंतु इतिहासाची वर्तमानाशी सांगड घालण्यासाठी लेखकाने त्याची सविस्तर मांडणी केलेली असावी॰
      स्वत: नाटककार आणि पत्रकार असल्यामुळे प्रमुख पात्रांची निवड, त्यांची शैली आणि त्या पात्रांचा कथानकातील खरेपणा बेमालूम पद्धतीने साकारल्यामुळे सर्व प्रसंग दृश्यपटलावर तपशीलवार दिसू लागतात॰ इतिहासाचा व्यासंग आणि अतिशय बारकाईने केलेला अभ्यास; लेखकाचे हे प्रयत्न स्पष्टपणे जाणवतात. इतिहासकालीन सुसंगत संदर्भ, वर्तमानकालीन राजकारण, पोलीस, खलपुरुष, त्यांचे मदतनीस या पात्रांची रचना आणि त्यांचा साधलेला मेळ विस्मयचकित करणारा आहे परंतु आबाजीच्या गटातील काही पात्रांचा उल्लेख मात्र  विनाकारण वाटला. मलपृष्ठावर लिहिलेल्या सारांशाला साजेसे मुखपृष्ठ कथेची उत्सुकता वाढवतात त्याकरिता श्री चंद्रमोहन कुलकर्णी ह्यांना अभिवादन
       एकूणच ३४७ वर्षांपूर्वीच्या इतिहासाला ३०नोव्हेंबर,२०१७ ते ४डिसेंबर,२०१७ मधील ७२ तासांत घडणाऱ्या नाट्यमय थरारकांच्या कल्पनाविलासाने उत्तम न्याय दिला आहे. १६८०पासून आजवर प्राप्त होऊ शकलेल्या बहुमोल खजिन्याचा आजच्या काळातील शोध गुंतवून टाकतो. अगदी सुरुवातीला झालेल्या साहिल ह्या व्यक्तिरेखेचे गूढ अगदी शेवटाला नकाशाचा दुसरा तुकडा मिळालेपर्यंत टिकून राहते तोवर बऱ्याच व्यक्तिरेखा आपापली भूमिका चोख बजावत राहतात. केतकीने वर्णन केलेला खोजनारांचा इतिहास आणि शिवमंथकाचा शोध लागल्यानंतर केतकीला होणार आनंद या घटना केतकी ह्या पत्राबद्दल अरंभीला निर्माण होणारा राग निश्चितपणे दूर करतात॰ खजिन्याचा शोध घेण्यासाठी महाराजांनी मोरोपंत पिंगळे यांच्याद्वारे केलेला प्रयत्न, त्यानंतर पेशव्यांचे प्रयत्न, इंग्रजांना ह्या संदर्भात कळल्यानंतर त्यांचे प्रयत्न त्याचप्रमाणे नागरी संघटना, उद्धारक समाज आणि 'खोजनारांचा इतिहास'राजकीय-सामाजिक घडामोडी, मानवी हव्यास, केतकी शौनक या नायक-नायिकेची हळुवार फुलणारी प्रेमकहाणी, प्रत्येक पात्राची करतवव्यभावना, केतकी, शौनक, अभोणकर सर, अजित जोशी, जयंत यांची बुद्धिमत्ता  या सर्व एकत्र गुंफलेल्या मांडणीला खरोखरीच सलाम
       सबंध कादंबरीला बांधून ठेवणाऱ्या ह्या ओळींचा उल्लेख इथेही आवश्यक वाटतो:
                       'अभयवदनकृष्णादेवीहीया
                        जगागास्तवनभजनपूजेसी
                        दरेगावीमुख्यतदितचरण
                        वन्दिमस्तकीभारसाजेविमल
                        पथदिसोगदिव्यसंजीवनाते'
       वरील ओळींच्या आकलनासाठी मोडी लिपी, मालिनी वृत्त, कृष्णवर्णी देवी, दरेगावचे पाटील, दिव्यसंजीवनाचा देवीच्या मस्तकाकडून मिळणार मार्ग या सर्व संबंधांचा मेळ साधताना कुठेही दमछाक झाल्याने दिव्या संजीवनाच्या पुढचा भाग वाचेपर्यंत पुस्तक हातातून ठेवावेसे वाटत नाही.
       नाशिक जिल्ह्यातील आदिवासी पाडा, भय सण उत्सव, वणी त्याचबरोबर सह्याद्रीच्या सातमाळा रांगेतल्या डोंगर आणि किल्ल्यांचे वर्णन वाचताना प्रत्यक्षात आपणही त्या चोरमार्गानी 'अचला' किल्ल्यावर पोचावे असे एखाद्यास वाटले नाही तरच नवल. क्रूर जॅक्सनचे अचंबित करणारे व्यक्तिमत्व आणि  मुंबईची एशियाटिक सोसायटी समोर आणून नवा धागा लेखकाने बांधला आहे.
      त्यानंतरची अभोणकर सर यांच्या लेखावर  किरण कुलकर्णीची प्रतिक्रिया, इतिहासाचे प्राध्यापक अरुण सर आणि पोलीस इन्स्पेक्टर गांगुर्डे इथून कादंबरी वेगाने वळण घेते. भूदेवीच्या मूर्तीमध्ये आबाजींना सापडलेला नकाशा आणि केतकी-शौनकला किरण कुलकर्णींच्या पणजोबांच्या वहीत लिहिल्याप्रमाणे सावनामधल्या पुस्तकांच्या बाइंडिंगमध्ये मिळालेला नकाशा आणि या नकाशांच्या देवाणघेवाणीनंतरचा चौसाळा, अचला, तवल्या, कोळदेहेर प्रवास, नकाशातील डोंगररांगांचा उलगडा, 'मनोहर' गडाचं विश्लेषण केवळ interesting!
      अंतिमतः ३४७ वर्षांनंतरही सत्तेच्या लुटीच्या शोधासाठी वेगवेगळ्या व्यक्ती, संघटना यांच्या प्रवासाचा लेखकाच्याच शब्दांत सारांश : ('शोध' पान नंबर ४९५)
"केवळ राज्यस्थापना हा आपला उद्देश नाही. देशातल्या प्रत्येक माणसाचं सुख आणि समाधान, हे आपलं उद्दिष्ट आहे! प्रत्येक माणसाला इतरांच्या बरोबरीने जगायला मिळालं पाहिजे! प्रत्येकाला पुढं जाण्याची संधी मिळाली पाहिजे! इतकी वर्ष  काही लोकांपुरती  मर्यादित असलेली साधनसंपत्ती सगळ्यांपर्यंत पोचली पाहिजे आणि तस व्हायचं असेल तर केवळ सत्तेवर विसंबून भागणार नाही. सत्तेतून नवे स्वार्थ उभे राहिले  तर  रयतेच्या भल्याच काय? त्यांची काळजी कोण करणार? सत्ताधारी कितीही सद्गुणी असला, तरी सत्तेच्या भोवती वावरणारी माणसं त्याच्या कर्तृत्वाला मर्यादा घालत असतात. राज्य वर्षानुवर्षे टिकायचं असेल, तर  रयतेच्या भल्याची काळजी करणारे स्वराज्याचे शिलेदारही आजूबाजूला असायला हवेत."
      खैरनारांनी 'शोध' मध्ये पसरलेले दोन धागे 'शिवाजीराजांची आग्र्याहून सुटका' आणि 'महाराजांवरील विषप्रयोग' यांची उकल करण्यासाठी गोंदाजी आणि केतकी -शौनकसारखे शिलेदार  हिंदवी स्वराज्याला हवेत.  
      एकूणच बहुतांगी अर्थांनी 'शोध' ही वेगळी आहे. 'शोध' एक अद्भुत थरार!

'शोध' मधील काही आवडलेली वाक्ये:
  • प्रकाश दिसला म्हणजे तिकडे हवी ती वाट असेलच असे नाही. कधीकधी अंधारलेली वाटच आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी पोचवते. (पान नंबर २८०)
  • पत्रकार म्हटलं की त्याच एक स्वतःच उपद्रव मूल्य असतंच. (पान नंबर ३१८)
  • इतिहास म्हणजे काही अंतिम सत्य नव्हे. इतिहास म्हणजे फक्त समजूत. ज्याची जशी समजूत त्याच्यासाठी तसा इतिहास. (पान नंबर ४८४)
  • ज्याला खोलवर बुडी मारून धांडोळा घ्यायची सवय असते त्याला पुन्हा पाण्यावर येऊन खुला श्वास घेणं कधीच अशक्य नसतं. (पान नंबर ४८९)



-प्रियांका डेगवेकर 






   

   

२ टिप्पण्या: